मार्च-एप्रिलचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात, पैसे आले नसतील तर लगेच करा ही कामे

|
Facebook

र्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले, कोणाला अजून आले नाहीत आणि का नाही आले, पैसे येण्यासाठी कोणत्या गोष्टी तपासाव्या लागतात, आणि अडचण असेल तर कुठे संपर्क करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखात आहेत

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये आता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे एकाच वेळी दोन हप्ते एकत्र येत आहेत. अनेक लाभार्थ्यांना सकाळपासूनच हे पैसे मिळाल्याचे दिसून आले. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झाले आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यांतील पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत.

पैसे कोणाला मिळाले आणि कोणाला नाही?

पैसे आलेल्या महिलांमध्ये एक समान गोष्ट आहे त्यांची सगळी कागदपत्रे व्यवस्थित होती. ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे, आधार बँक खात्याशी लिंक आहे, डीबीटी चालू आहे, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे आणि बँकेची केवायसीही झालेली आहे अशा महिलांना हे पैसे मिळाले आहेत. पण ज्यांच्याकडे यापैकी कुठलीही एक गोष्ट अपूर्ण राहिली, त्यांचे पैसे अडलेले आहेत. हे ऐकायला साधं वाटतं, पण प्रत्यक्षात बऱ्याच महिलांना माहीतच नसतं की त्यांची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही. बँकेची केवायसी वेगळी असते आणि लाडकी बहीण योजनेची केवायसी वेगळी असते या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, एक केली म्हणजे दुसरीही झाली असं नाही. हाच सगळ्यात जास्त गोंधळ होतो.

पैसे का नाही आले? या कारणांमुळे पैसे थांबतात

पैसे न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातील सगळ्यात सामान्य कारण म्हणजे ई-केवायसी न केलेली असणे. याशिवाय आधार आणि बँक खाते लिंक नसणे, डीबीटी बंद असणे, अर्ज अजून पेंडिंग असणे, अर्ज रिजेक्ट झालेला असणे, बँक खात्याचा नंबर चुकीचा दिलेला असणे, मोबाईल नंबर अपडेट नसणे किंवा पडताळणी प्रक्रिया अजून सुरू असणे ही सगळी कारणे पैसे अडण्यास कारणीभूत ठरतात. यात एनपीएससीआय मॅपिंग नसणे हेही एक कारण आहे जे बऱ्याच जणांना माहीत नसते. या सगळ्या गोष्टी एकत्र असल्या तरच पैसे खात्यात येतात. एकही गोष्ट चुकली की हप्ता अडतो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, पण हे सगळं एकदा नीट तपासून घेणे गरजेचे आहे.

आता काय करायचे? तीन महत्त्वाच्या गोष्टी

पहिली गोष्ट: बँकेशी संबंधित गोष्टी तपासा. बँकेत जाऊन आधार लिंक आहे का ते विचारा. डीबीटी चालू आहे का ते तपासा. बँकेची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का हे देखील बँकेत विचारूनच कळेल. या तीन गोष्टी बँकेत जाऊन एकाच वेळी तपासता येतात, त्यामुळे एकच फेरी टाका आणि सगळं नीट करून घ्या.

दुसरी गोष्ट: लाडकी बहीण योजनेचा अर्जाचा स्टेटस तपासा. त्यासाठी गुगल क्रोम उघडा, ‘लाडकी बहीण योजना’ असे सर्च करा. अधिकृत वेबसाइटवर जा, मोबाईल नंबर आणि ओटीपी टाका, लॉगिन करा. तिथे तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झाला आहे हे दिसेल. अर्ज अप्रूव्ड असेल तर पैसे येत राहतील. पेंडिंग असेल तर पडताळणी सुरू आहे असा अर्थ आहे. रिजेक्ट असेल तर चुकीची माहिती, चुकीचे कागदपत्र किंवा आधारची काही समस्या असू शकते.

तिसरी गोष्ट: लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करा. ही केवायसी बँकेच्या केवायसीपेक्षा वेगळी आहे. दोन्ही केवायसी झाल्याशिवाय पैसे येणार नाहीत. सध्या या योजनेची ई-केवायसी वेबसाइट पूर्णपणे सुरू झालेली नाही, पण लवकरच सुरू होणार आहे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जेव्हा सुरू होईल तेव्हा लगेच करून घ्या. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबरवर कॉल करा.

हेल्पलाईन नंबर १८१

पैसे न आलेल्या महिलांसाठी सरकारने १८१ हा टोल-फ्री हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. हप्ता न आलेल्या, अर्ज पेंडिंग असलेल्या, रिजेक्ट झालेल्या, यादीत नाव नसलेल्या, डीबीटी किंवा आधार लिंकची समस्या असलेल्या, किंवा मोबाईल नंबर अपडेटची अडचण असलेल्या कुठल्याही महिलेने या नंबरवर कॉल करता येतो. कॉल करताना जवळ काय ठेवायचे? अर्ज क्रमांक, आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक. हे तीन कागद हातात असतील तर कॉलमध्ये लवकर सोडवणूक होते. उगाच रांगेत वेळ वाया न घालवता हा नंबर वापरला तर बरीच कामे घरूनच होऊ शकतात.

पैसे अजून न आलेल्या महिलांनी घाबरू नये

एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे त्यांचे पैसे थांबलेले आहेत, पण ते कायमचे बंद झालेले नाहीत. केवायसी पूर्ण केल्यावर थकलेले हप्तेही नंतर मिळतात. फक्त हे काम उशिरा न करता लवकरात लवकर करून घ्या. मार्च, एप्रिल, मे किंवा त्याआधीचेही हप्ते आले नसतील तर आधी डीबीटी तपासा, आधार लिंक तपासा, बँकेची केवायसी तपासा आणि योजनेचा अर्ज स्टेटस तपासा. या चार गोष्टी नीट असतील तर बाकी सगळं आपोआप होते. आणि काही अडचण असेल तर १८१ वर कॉल करा हे काम स्वतः करण्यापेक्षा एकदा कॉल करून विचारणे कधीकधी जास्त सोपे असते.

Keep Reading

Leave a Comment